खाटा उपलब्ध नसल्याने रुग्ण वेटिंगवर

Foto
घाटी आता  गरिबांची राहिली नाही!
  • कोरोना रुग्णांच्या संख्येत होतेय झपाट्याने वाढ 
  • दाखल करून घेण्यास केली जाते टाळाटाळ 
  • खासगी रुग्णालयात जाण्याचा दिला जातो सल्‍ला 
  • गरीब रुग्णांनी जावे तरी कुठे?
खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडणारे नसल्याने गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना घाटी रुग्णालयाचा मोठा आधार आहे. परंतु अलिकडच्या कोरोना काळात घाटीत रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. तर काही डॉक्टर तुमच्या पेशंटला उपचारासाठी खासगी रुग्णालयात घेऊन जा असा सल्‍ला देत आहेत. आमच्याकडे खाटा उपलब्ध नाही असे कारण दिले जात आहे.  कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. खासगी रुग्णालये रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याचे कारण देऊन दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत आहे. पण आता घाटी रुग्णालयातही खाटा उपलब्ध नसल्याचे कारण देऊन रुग्णाला दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने घाटी आता गरिबांची राहिली नाही, असे बोलले जाऊ लागले आहे.
घाटी म्हणते जागा आहे
घाटी रुग्णालयात बेडची विचारणा केली असता घाटी रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना कॅज्युलटीमध्ये आगोदर दाखल करण्यात येते. त्याठिकाणी 12 बेड आणि 4 व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. अगोदर रुग्णांना कॅज्युलटी मध्ये दाखल करून उपचारासाठी सुरुवात केली जाते त्यानंतर वार्डात जागेनुसार शिफ्ट केले जाते. काल देखील जागा होती आणि आज देखील केवळ एकच रुग्ण कॅज्युलटी मध्ये आहेत 11 बेड व्हॅकंट असल्याचे घाटी रुग्णालयाकडून अधिकार्‍यांनी सांगितले. गरज पडल्यास आणखी बेड वाढविण्यासाठी प्लॅन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आणखी बेड वाढविण्यासाठी 
प्रयत्न : डॉ. नीता पाडळकर
कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेऊन बेड उपलब्ध करून दिले जात आहे. सध्या क्रीटीकल रुग्णांसाठी खासगी रुग्णालय, घाटी सह आदी ठिकाणी सगळ्या ठिकाणी अठराशे च्या जवळपास बेड उपलब्ध करून दिले आहेत. तसेच मनपाच्या कोव्हिड सेंटर मधेच दोन हजार बेड उपलब्ध आहेत. बाहेरून देखील रुग्ण सध्या शहरात येत आहेत. त्यामुळे अजून बेडची गरज आहे. आणखी रुग्णांच्या संख्येनुसार एक हजार बेड वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
एकीकडे कोरोनाची जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत चालली आहे. दुसरीकडे खासगी रुग्णालयात रुग्णांना जागा मिळत नाही अशी परिस्थिती दिसून येत आहे. त्यातच घाटी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गरीब लोक जातात तर त्यांना चकरा मारण्याची वेळ आली आहे. यामुळे आता गरिबांनी जावे तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाहिली तर 27 हजार पार गेली आहे. अशातच अनेक रुग्णांना बेडसाठी भटकावे लागत आहेत. खासगी रुग्णालयात देखील अनेक रुग्णांना तास न तास वेटिंगवर राहण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत घाटी रुग्णालयात अनेक रुग्ण उपचारासाठी जातात तर त्यांना देखील भटकंती करण्याची वेळ आल्याने रुग्ण त्रस्त होत आहेत. 
खासगी रुग्णालयात मिळेना जागा
खासगी रुग्णालयात देखील रुग्णांना जागा मिळत नाही. रुग्णांना तास न तास फिरवण्याची वेळ आली आहे. खासगी रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी जात आहेत परंतु जागा नाही असे सांगितले जात आहेत. यामुळे अनेक रुग्णांना तास न तास फिरावे लागते आहे.